लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात मेहनती शेतकरी आहेत, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जिद्दीने मेहनत करण्याची तयारी असेल तर नाल्यामध्ये पाझरून आलेले पाणी अडवून देखील प्रयोगशील शेती करता येते हे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाथरज पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. तेथील १५ शेतकऱ्यांनी यावर्षी तब्बल १० लाख झाडांच्या रोपांची निर्मिती आपआपल्या रोपवाटिकेत केली आहे.कर्जत तालुक्यातील डोंगरपाडा येथे पाझर तलाव असून त्या तलावाचे पाणी जमिनीत झिरपून खाली नाल्यातून वाहून जात असते. ते पाणी त्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधून अडविण्यात आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पर्यायी शेती करण्याची संधी मिळाली आहे. पाझर तलावातून पाझरून जाणाऱ्या पाण्याची क्षमता फार मोठी नाही, परंतु मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे हे डोंगरपाडा तलावाखाली शेती करणाऱ्या शेतक ऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पावसाळा संपला की हे सर्व शेतकरी करंज, बेहडा, काशिद, साग, आंबा, काजू, खैर, सीताफळ, कांचन, पेरू, बिब्बा, दंतपर्णी, चिंच, आवळा अशा प्रकारची झाडे यांची रोपे तयार करण्याचे काम आपल्या रोपवाटिकेत करण्यासाठी हे सर्व शेतकरी वाडा तालुक्यात जावून रोपे तयार करण्यासाठी बियाणे आणतात.डिझेल पंप लावून नाल्यातून पाणी उचलून रोपवाटिका शेती हे सर्व शेतकरी करीत असतात.त्यांचा थोडा त्रास कमी करण्याचे काम कर्जत तालुक्यातील मोठ्या संख्येने असलेले फार्महाऊस करीत असतात. त्यातच शासनाच्या योजनांप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हे ग्रामपंचायती यांना बंधनकारक करण्यात आल्याने या रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली १० लाख रोपे बहुसंख्येने विकली जातात. प्रामुख्याने जून महिन्यात म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून ९० टक्के रोपांची विक्र ी होते आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचे काम हे शेतकरी करीत असतात.पाथरज, डोंगरपाडा या गावातील भरत लोहकरे, प्रकाश सुपे, भास्कर इष्टे, रवींद्र मोडक, सुरेश केवारी, दिनेश केवारी, सीताराम केवारी, वामन लोहकरे, पुंडलिक लोहकरे, लक्ष्मीकांत दळवी, नामदेव वारघडे, अनंता पादिर, चांगो पादिर, चंद्रकांत ऐनकर, हरिश्चंद्र भोपी, भगवान इष्टे हे शेतकरी रोपवाटिका व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या या रोपे बनविण्याच्या कामाचा फायदा जिल्ह्याचा नैसर्गिक समतोल वाढण्यासाठी होत आहे, त्यामुळे हा नर्सरी व्यवसाय कर्जत तालुक्यातील मेहनती शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्तर वाढविणारा ठरला आहे.
पाझर तलावाचे पाणी अडवून शेती
By admin | Updated: May 13, 2017 01:11 IST