दासगाव : महाडमध्ये ऐन सुट्टीच्या दिवशी आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याने कॅम्पला नागरिकांची किरकोळ हजेरी दिसून आली. यामुळे इतर दिवशी जमा होणाऱ्या महसुलाच्या रकमेपेक्षा निम्मी रक्कमच जमा झाल्याने या कॅम्पचा ना सरकारला फायदा झाला ना नागरिकांना. चौथा शनिवार सुट्टी असून दुसऱ्या दिवशी रविवार लागल्याने आता कॅशिअरला जमा रक्कम बँकेत भरणा करणे शक्य होणार नसल्याने जमा रक्कम सांभाळण्याचा धोका या कॅशिअरला पत्करावा लागणार आहे. शनिवारी महाडमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेणमार्फत आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक आरटीओ कॅम्पला महाडमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र २५ जुलै रोजी चौथा शनिवार असल्याने गर्दी जमा झाली नाही. सुट्टीच्या दिवशी लावलेल्या या कॅम्पचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशी कॅम्प असेल तर सुमारे दोन ते अडीच लाखचा महसूल गोळा होतो. मात्र २५ जुलैच्या कॅम्पच्या दिवशी निम्मी रक्कमही गोळा होणार नाही हे उपस्थितीवरून दिसून येत होते. आरटीओ कॅम्पमध्ये नवीन परवाना काढणे, परवाना नूतनीकरण, चालक लायसन्स, वाहन नोंदणीकरण आदी कामे केली जातात. इतर दिवशी कॅम्पला मोठी गर्दी होते. २५ जुलै रोजी झालेल्या कॅम्पला तुरळक गर्दी दिसून आली. यामुळे शासनाच्या झालेल्या नुकसानीस आणि नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेता कॅम्पचे आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. याठिकाणी जमा झालेली रक्कम शासकीय नियमानुसार बँकेत भरणा होणे अपेक्षित आहे, मात्र शनिवार असल्याने बँक देखील दुपारीच बंद झाली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने जमा झालेली शासकीय रक्कम ही कॅशिअरला धोका पत्करून स्वत:कडे सांभाळावी लागणार आहे. अशाच प्रकारे पुढे गणपती आणि दिवाळीमध्ये सुट्टीच्या दिवशी कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाडच्या आरटीओ कॅम्पमध्ये चर्चेदरम्यान समोर आली. (वार्ताहर) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कॅम्पचे आयोजन केले आहे. - एच. डी. काल्हेकर, मोटार वाहन निरीक्षक. महिना पूर्ण झाला की पुढील दिवशी कॅम्पचे आयोजन केले जाते. यामध्ये आम्ही महिना अॅडजस्ट करतो. जमा झालेली कॅश कॅशिअर सांभाळेल. - एस. एच. कामत, डेप्युटी आर. टी. ओ.
सुट्टीच्या दिवशी आरटीओ कॅम्प
By admin | Updated: July 25, 2015 22:42 IST