लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या दिवसेन्दिवस वाढतच आहे. वीकेंडसाठी कोकणात गेलेले चाकरमानी रविवारी परतले. मात्र, महामार्गावरील अजवड वाहनांमुळे त्यांना कोंडीचा फटका बसला. यामुळे प्रवासी, तसेच चालक हैराण झाले. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कुर्म गतीने चाललेले बांधकाम व दैनंदिन घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाचा प्रवास म्हणजे यमाच्या दरबारातील प्रवास ठरत आहे. त्यात भर म्हणून प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या. पळस्पे ते महाड या दरम्यान असणारे छोटे-मोठे उद्योगधंदे यामुळे या भागात वर्षाच्या बाराही महिने अवजड वाहनांची सतत वाहतूक चालू असते. तर दरवर्षी गणेशोत्सव, दीपावली व होळी सणांबरोबरच मे महिन्यात साजरे होणारे विवाह सोहळे या समारंभाच्या वेळी प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्यास त्याचा फटका वाहतूककोंडीला बसत आहे.गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी विवाहाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने व काही विवाहाच्या तिथी विशिष्ट दिवसांना अधिक असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर शनिवार, रविवार विवाह मुहूर्त अधिक असल्याने महामार्गावर जाणाऱ्या वऱ्हाडांनाही कोंडीचा फटका बसला. विवाहाचा मुहूर्त टळून गेला तरी अनेक वाहने वाहतूककोंडीत अडकून पडलेली दिसली. त्यामुळे वाहनचालक व प्रवासीवर्गाला विविध समस्यांचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वऱ्हाडी मंडळी व नवरदेवांच्या गाड्याही वाहतूककोंडीत अडकल्याने विवाहमुहूर्त लांबणीवर पडल्याने एकच गोंधळ उडाला. ठिकठिकाणी अवजड वाहने, प्रवासी वाहने कोंडीत सापडल्याने मार्गक्रमण करणे कठीण होऊन गेले. रखरखत्या उन्हात कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी कायम
By admin | Updated: May 8, 2017 06:20 IST