कर्जत : कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळेवाडी येथील एका फार्महाऊसमध्ये दहा टन रक्तचंदनाचा साठा सापडला आहे. साधारण तीन कोटी रुपये किमतीचा हा रक्तचंदनाचा साठा कर्जत वनविभाग आणि नेरळ पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये पकडण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदन सापडल्याने कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.वन विभागाला त्या कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची माहिती दुपारी मिळताच कर्जतचे वन अधिकारी आर. बी. घाडगे यांचे मार्गदर्शन घेवून वनपाल महाजन आणि वनरक्षक बेंदले हे नेरळ पोलिसांना बरोबर घेवून नारळेवाडीमध्ये पोहचले. तेथील अकबर हुसेन तथा राजूभाई यांच्या फार्महाऊसमध्ये कंटेनर उभा असल्याचे दिसून येताच वन विभाग आणि नेरळचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, एएसआय म्हात्रे यांच्या पथकाने धाड टाकली. अकबर हुसेन यांच्या फार्महाऊसमध्ये कंटेनरसह जीजे०५ -०८७० ही हुंदाई कंपनीची आय-२०कार देखील उभी होती. कंटेनरची झडती घेतली असता त्यात आणि फार्महाऊसमध्ये दुर्मीळ रक्तचंदनाचे ४५ मोठे ओंडके सापडले. त्यांचे वजन वन विभागाने केले असता दहा टन झाले. त्याची बाजारातील किंमत साधारण तीन कोटी रुपये भरणार आहे. (वार्ताहर)
तीन कोटींचे रक्तचंदन जप्त
By admin | Updated: July 27, 2015 03:01 IST