नागोठणे : येथील शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी व दुपारी आमडोशी येथून एसटी बस सुटत असते. मात्र, ही गाडी वेळेवर येत नसल्याने शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी नाईलाजाने मिनीडोर रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. एसटीचा मासिक पास असूनही रिक्षा खर्च विद्यार्थ्याला सहन करावा लागत असल्याने विद्यार्थीवर्गाने रोहे आगार प्रमुख यांना निवेदन देवून त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले आहे.विभागातील आमडोशी, वांगणी, बाळसई, वाकण, चिकणी येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी नागोठणेत येण्यासाठी नागोठणे - आमडोशी - नागोठणे अशी एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतांशी विद्यार्थी या गाडीचा नियमितपणे वापर करीत असून त्यांनी एकशे वीस रु पयांचे मासिक पास देखील काढला आहे. पूर्वी ही गाडी रात्रीच्या वस्तीला आमडोशीत राहात असल्याने वेळेवर म्हणजे सकाळी साडेसहा वाजता तेथून सुटत असे. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या वेळेत पोहोचत असत. मात्र,आता ही गाडी आमडोशीऐवजी नागोठणे बसस्थानकात वस्तीला राहून पहाटे साडेपाचला बेणसेकडे रवाना होवून ती परत आल्यानंतर आमडोशीकडे जात असते. संबंधित गाडी रस्त्याच्या दुर्दशेमुळे बेणसेहूनच यायला उशीर होत असल्याने पर्यायाने आमडोशीला गाडी वेळेवर पोहोचत नाही. वांगणीचे सरपंच एकनाथ ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते घनश्याम जांबेकर तसेच त्रस्त विद्यार्थीवर्गाने वेगवेगळी दोन निवेदने देवून रोहे आगार प्रमुख सावंत यांचे लक्ष वेधले आहे. (वार्ताहर)
एसटी अनियमित; विद्यार्थ्यांना फटका
By admin | Updated: July 30, 2015 23:45 IST