रोहा : गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील रोहा, महाड, कर्जत, मुरुड परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. कोलाड, खांब, वरसे, रोहा शहराबरोबरच सुमारवाडी व कोलाड भागातील घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चोरट्यांनी घरफोडीचा मोर्चा मेढा भागात वळवून बंद आरोग्य उपकेंद्राला लक्ष्य केले. ही घटना ताजी असतानाच यशवंतखार गावात मंगळवारी रात्री तीन घरे फोडून रोकड लंपास केल्याचे समोर आल्याने पुन्हा एकच खळबळ माजली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ग्रामीण भागात मंदिराची दानपेटी, आरोग्य उपकेंद्र त्यासोबत बंद घरे फोडण्याचे प्रकार अधिकच वाढले आहेत. त्यातच दोन-तीन दिवसाआड कुठेतरी घरफोडीची घटना घडत असताना भुरट्या चोरट्यांनी पोलिसांसमोर पुन्हा आव्हान उभे केले आहे. या चोरट्यांचे धाडस वाढल्याने पुन्हा मंगळवारी रात्री यशवंतखार येथील तीन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यातील एका बंद घरातील लोखंडी कपाट, कोयंडा, टाळे फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यशवंतखार येथील लता म्हात्रे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. घराचा कडी कोडयंडा तोेडून चोरांनी आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील रोकड चोरट्यांनी लंपास केली. त्यांच्या घराशेजारील आणखी दोन बंद घरे फोडण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. ही तब्बल पंधरवड्यातील सहावी सातवी घटना म्हणावी लागेल. यशवंतखार घरफोडी चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर नेहमीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत.दरम्यान, तालुक्यात घरफोडीची मालिका सुरूच आहे. याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. चोरीच्या वारंवार घटना का घडतात, याचा तपास कार्यक्षमतेने झाला पाहिजे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. (वार्ताहर)याआधी पाथरशेत, कोलाड, उडदवणे, वरसे, रोहा, मेढा, सुतारवाडीपाठोपाठ आता चोरट्यांनी दुर्गम भागातील यशवंतखार गावाकडे मोर्चा वळवला आहे. या सर्व घटनांमधील चोरटे हे भुरटे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सर्वच घरफोडी, चोऱ्यांबाबत काहीच धागेदोरे पोलिसांना अद्याप हाती लागलेले नाही.
रोह्यात घरफ ोडीची मालिका सुरूच
By admin | Updated: July 30, 2015 23:45 IST