अलिबाग : सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ आॅक्टोबर शनिवारपर्यंत रस्त्यांची दुरु स्ती न केल्यास शिवसेना सोमवारी १७ आॅक्टोबरला अलिबाग बंदची हाक देईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला. अलिबाग तालुक्यातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या प्रश्नी आता शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टीमेटम देत जनतेच्या प्रश्नी आपणच आक्र मक असल्याचे दाखवून दिले.याआधी काँग्रेस, भाजपा, आम आदमी पार्टी यांनी रस्त्याच्या प्रश्नी आवाज उठविला होता.अलिबाग तालुका शिवसेनेने सोमवारी थेट अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्लाबोल केला. मात्र कार्यकारी अभियंता विलास पाटील कार्यालयात नसल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे पित्त चांगलेच खवळले. त्यांनी कनिष्ठ अभियंता चंदन पवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना सबुरीचा सल्ला दिला. परंतु कार्यकर्ते चांगलेच आक्र मक झाले होते. लेखी आश्वासन मिळेपर्यंत त्यांनी पाटील यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. त्यांनतर उप अभियंता व्ही.जी.देशपांडे यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी देशपांडे यांना चांगलेच फैलावर घेतेले. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची तुम्हाला फिकीर नाही. त्यामुळेच कार्यालयामध्ये एकही सक्षम अधिकारी उपस्थित राहिला नाही, असे म्हात्रे यांनी सुनावले. त्यानंतर खड्डे भरण्याबाबत देशपांडे काहीच बोलत नसल्याने पुन्हा शिवसेनेचे कार्यकर्ते आक्र मक झाले. तालुका प्रमुख दीपक रानवडे यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. त्यावेळी चंदन पवार यांनी लेखी आश्वासन दिले. परंतु खड्डे भरण्याचा कालावधी निश्चित केला नसल्याचे पत्रात दिसून आल्यावर शिवसेनेने बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर शनिवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले.शनिवारपर्यंत खड्डे भरले नाही, तर शिवसेना अलिबाग बंदची हाक देईल. बंदला व्यापारी वर्ग, तीन आसनी, सहा आसनी रिक्षा संघटनेचा पाठिंबा असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता विलास पाटील यांना पूर्वसूचना दिलेली असतानाही ते कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. तसेच कोणताही उपअभियंता उपस्थित नव्हता. पाटील हे कामानिमित्त उच्च न्यायालयात गेले असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
रस्त्याच्या प्रश्नी अलिबाग शिवसेनेची बंदची हाक
By admin | Updated: October 11, 2016 03:15 IST