अलिबाग : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या एकूण ६१ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. ३४ जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षणानुसार एकूण जागांपैकी ३१ जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. महिला आरक्षणामुळे रायगड जिल्हा परिषदेवर महिलांचे वर्चस्व अधिक राहणार आहे. आरक्षणामुळे दिग्गजांचे पत्ते मात्र कापले गेल्याने त्यांचे चेहरे चांगलेच पडल्याचे दिसून आले.सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत पार पडली. समीर मुदगल या मुलाच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढण्यात आली. याप्रसंगी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सभागृहात प्रचंड गर्दी केली होती. महिला आरक्षणाच्या ३१ पैकी १७ जागा या सर्वसाधारण गटातील महिलांसाठी, तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आठ, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी अनुक्रमे दोन आणि चार जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा कर्जत-नेरळ मतदार संघ गेल्या वेळच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटासाठी राखीव होता. आताच्या आरक्षणानुसार मात्र तो अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. विद्यमान अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांचा अलिबाग-कुर्डूस मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. आता सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला असल्याने त्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.मतदार संघाच्या पुनर्रचनेचा फटका दिग्गजांना बसला आहे. शेकापचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांचा नावडे मतदार संघ, तर माजी महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांचा कळंबोली मतदार संघच नामशेष झाला आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेवर रणरागिणींचे वर्चस्व
By admin | Updated: October 25, 2016 03:52 IST