अलिबाग : रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते.शौचालये उभारण्याच्या कामांमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी आपापले योगदान दिले आहे. तीन लाख ३४ हजार ९१८ शौचालयांपैकी आतापर्यंत तब्बल तीन लाख १५ हजार ९०५ शौचालये उभारण्यात रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला यश आले आहे. आपल्या निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करण्यामध्ये म्हसळा आणि तळा तालुका आघाडीवर राहिला आहे. त्यांनी आपल्या वाट्याचे शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्या खालोखाल महाड तालुक्याने ९७.७१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. त्यांनी ३३ हजार ४७६ शौचालये बांधली आहेत. उरण ८७.९० टक्के टार्गेट पूर्ण केले (२० हजार ४०५), पोलादपूर ९६.८१ टक्के टार्गेट पूर्ण केले (नऊ हजार ७०९), माणगाव ९६.३९ टक्के टार्गेट पूर्ण केले (२८ हजार १६२), मुरु ड ९६.२६ (१२ हजार ४७२), रोहा ९६.१६ (२५ हजार २९६), श्रीवर्धन ९५.६३ (१४ हजार ४३२), खालापूर ९५.१८ (२१ हजार १०८), सुधागड ९२.८१ (१४ हजार १२३), पनवेल ९२.९१ (३२ हजार ९२०), अलिबाग ८८.३९ (३५ हजार ८६९), पेण ८१.२३ (२४ हजार ८३०), कर्जत ७४.४६ (२३ हजार ७२५) अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांचे टार्गेट अद्यापही मोठे आहे. १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र, या तीन तालुक्यांमुळे ते आता शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होते.तीन तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास लक्ष्यांक गाठणे कठीण होणार नाही. या तालुक्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी सांगितले.
‘हागणदारीमुक्ती’ रायगड मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:42 IST