पाली : सुधागड तालुका हा मुंबई व पुणे या शहरापासून जवळच्या अंतरावर असल्याने आज मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातील धनिकांनी जमिनी खरेदीसाठी सुधागड तालुक्याला पसंती दिल्याने तालुक्यात जमिनी खरेदी-विक्र ीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. परंतु हे जमिनी खरेदी-विक्र ी व्यवहार सुधागड-पाली येथील ज्या दुय्यम निबंधक कार्यालयातून केले जातात, त्या कार्यालयाचे दुय्यम निबंधक अधिकारी हे पदच गेली कित्येक महिन्यांपासून रिक्त असल्याने सध्या या कार्यालयाचा गाडा येथील लिपिक असलेल्या महिला कर्मचारी यांना प्रभारीपदी बसवून हाकला जात आहे. येथे खरेदी-विक्र ी व्यवहारासाठी येणाऱ्या पक्षकारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक खरेदी-विक्र ीचा व्यवहार नोंदणी करताना या प्रभारीपदी असलेल्या अधिकाऱ्याला अलिबाग येथील वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घ्यावे लागत असल्याने पक्षकारांना व्यवहार नोंदणीसाठी एक एक दिवस फुकट घालवावा लागत आहे. झालेल्या व्यवहाराचे नोंदणीकृत दस्त मिळविण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पहावी लागत असल्याने पक्षकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कार्यालयात दररोज नागरिकांची मोठ्याप्रमाणात ये-जा असते. यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नाही, तसेच या कार्यालयाला दलालांनी वेढले असून येथे एकही काम दलालांशिवाय होत नाही म्हणूनच तिथे त्यांची मनमानी सुरूअसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. हे कार्यालय पालीतील एका इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. तरी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
दुय्यम निबंधक कार्यालयात समस्या
By admin | Updated: October 15, 2016 06:50 IST