म्हसळा : म्हसळा शहरातील जनता अपुरी आरोग्य सेवा, पाणीटंचाई, खड्ड्यातले रस्ते, दिघी पोर्टची अवजड वाहतूक, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व भारनियमन, वाहतूक कोंडी, तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अपुरे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या यामुळे खोळंबणारी नागरिकांची शासकीय कामे यामुळे जनता वैतागली आहे. रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी म्हसळा शहर व तालुक्याची विकासकामे व येथील जनतेच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. म्हसळ्यात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या तीन वर्षात तीन तर पालकमंत्री प्रकाश मेहता यांची अडीच वर्षात केवळ एकच फेरी झाली आहे. सत्ताधारी पक्षात असतानाही दोन्ही मंत्र्यांकडून केंद्र वा राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर म्हसळा शहरासह तालुक्यात विकास कामे करण्यात अपयशी ठरले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना व भाजपाला याचा जोरदार फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. तत्कालीन पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांना आठवड्याचा मंत्री म्हणून बोलणारे सत्ताधारी सेनेचे पदाधिकारी आपले मंत्री अमावस्या-पौर्णिमेसारखे वर्षातून एकदाच येत असल्याने चांगलेच तोंडघशी पडले आहेत. त्याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व म्हसळा पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसणार असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत . (वार्ताहर)
शिवसेना, भाजपाला फटका बसण्याची शक्यता
By admin | Updated: November 9, 2016 03:55 IST