लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२७ ते १२८ कि.मी.मधील रस्त्याचा भाग खचून दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबतचे निवेदन महाडचे आ. भरत गोगावले यांनी महाड प्रांताधिकाऱ्यांना दिले असून उपाययोजनेची मागणी के ली आहे.नडगाव ग्रामपंचायतीमधून जाणाऱ्या या रस्त्याला सावित्री नदी पात्र लागून असून या रस्त्याकडील भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत, तसेच या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरून येणारे पाणी जाण्यासाठी गटार नसल्याने ते पाणी रस्त्यावर साचून जमिनीत मुरत असल्याने या ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात सावित्री नदीला पूर आल्यास हा रस्ता खचून पूर्णपणे नदीच्या पात्रात वाहून जावून सावित्री पूल दुर्घटनेसारखी घटना घडू शकते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे महाड येथील उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील उपाययोजना केलेली नाही. पुढील काळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणच्या जागेची पाहणी करून उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
महामार्गावरील रस्त्याचा भाग खचण्याची शक्यता
By admin | Updated: July 17, 2017 01:23 IST