अलिबाग : वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे रायगड या अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याला प्लॅस्टिकचा वेढा पडू लागला होता. त्यावर मात करण्याकरिता पर्यटकांकडून ‘डिपॉझिट फॉर प्लॅस्टिक’ अर्थात, प्लॅस्टिक बंदीकरिता अनामत रक्कम घेण्याची योजना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिन्याभरापासून सुरू केली.किल्ल्यावर येणा-या पर्यटकांकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे वेष्टन असलेल्या वस्तू, प्लॅस्टिक पिशवीत पदार्थ असतात. वापर झाल्यावर ते इतस्त: फेकून दिल्यामुळे हा प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होतो. वस्तुत: किल्ल्यावर कचरा संकलनाची सोय आहे. मात्र, पर्यटक त्याचा वापर करताना दिसत नव्हते. परिणामी, किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचºयाचा वेढा पडला होता. साहजिकच, जिल्हाधिकाºयांनी डिपॉजिट योजना राबविली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: पुढाकार घेऊन किल्ल्यावर प्रथम स्वच्छता मोहीम राबविली होती.या योजनेनुसार किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेमध्ये बसताना पर्यटकांकडून प्रति प्लॅस्टिक वस्तू २५ रुपये अनामत रक्कम रोपवे व्यवस्थापनाकडून घेतली जाते. फिरून आल्यानंतर रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, वेष्टने पुन्हा रोपवे व्यवस्थापनाकडे जमा करून आधी जमा केलेली डिपॉझिट रक्कम पर्यटकांना परत दिली जाते. जिल्हा प्रशासनाने गडावर पायी जाण्याच्या मार्गावरही ही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे किल्ला प्लास्टिकमुक्त राखण्यास मदत होणार आहे.
रायगड किल्ल्यावर प्लॅस्टिक बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:33 IST