- वैभव गायकरपनवेल - गावठाण क्षेत्रालगत गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड देणारे असे लेखी आश्वासन देणाऱ्या सिडको महामंडळाने अद्यापही पळस्पे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड देणे जाणिवपुर्वक टाळल्याने दि.23 रोजी पळस्पे ग्रामस्थांनी सिडकोवर आसूड मोर्चा काढत.सिडकोने दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सिडको नैना क्षेत्रातील शेकडो गरजेपोटी घरांना नोटिसा बजावत स्थानिकांची घरे अनधिकृत ठरवली आहेत.याविरोधात दोन वर्षांपूर्वी पळस्पे येथील ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण पुकारले होते.त्यानंतर सिडकोने प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत लेखी आश्वासन दिले मात्र याकरिता केला जाणारा सर्व्हे देखील सिडकोने केलेला नाही.उलटपक्षी गावठाण बाहेरील गरजेपोटी घरांना सिडको अनधिकृत ठरवत नोटिसा बजावत सुटल्याने पळस्पे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.नैनाचे बेलापूर रेल्वे स्थानकातील टॉवर क्रमांक 10 येथील कार्यालयात ग्रामस्थांनी गोंधळ घालत प्रॉपर्टी कार्डची मागणी केली.यावेळी 95 गाव व नैना प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,शेकापचे नेते अतुल म्हात्रे,गावठाण विस्तार हक्क समितीचर अध्यक्ष अनिल ढवळे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने पळस्पे ग्रामस्थ उपस्थित होते.