अलिबाग : रायगड जिल्हा महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या कामाची दखल घेऊन, शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते अत्युत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी घरठाण जमिनी आदिवासींच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर, पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांचे १५० जमीन घरठाण दावे दाखल करून घेण्यात पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी रायगड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांकाचे काम करून दाखविले आहे. पेणनंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात ही प्रक्रिया गतिमान झाली. वार्षिक महसूल वसुलीत १०० टक्केहून अधिक महसूल वसुली करून पाटणे यांनी जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले आहे. कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपध्दतीचे सुलभीकरण, ई-गर्व्हनस, अनुउत्पादक खर्चात काटकसर, महसूल उत्पन्न वाढविणे, प्रशासन लोकाभिमुख करणे या बाबतीतही पाटणे यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे. शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमात भूसंपादन अधिकारी अपूर्वा वानखेडे, नायब तहसीलदार भारत फुलपगारे, अव्वल कारकुन तुषार कामत, मंडळ अधिकारी एस.बी.मोकल, तलाठी ए.ए.सय्यद, वाहन चालक सचिन आगरे, कोतवाल शशिकांत म्हात्रे, शिपाई आर.के.बांबुरकर यांचाही गौरव के ला.
पेण तहसीलदार अजय पाटणे यांना अत्युत्कृष्ट अधिकारी पुरस्कार
By admin | Updated: April 24, 2017 02:31 IST