जयंत धुळप / अलिबागनिराधार आणि घर नसलेल्यांकरिता देशात अमलात आणण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रायगड जिल्ह्यात ३ हजार ३६ ग्रामस्थांच्या घरांना आॅनलाइन मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार २६५ ग्रामस्थांना वित्त साह्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, तर १ हजार ६७ जणांना घरांसाठी दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही प्रत्येक भारतीयासाठी स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी केलेली महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत सन २०२२ पर्यंत शहरी गरिबांसाठी २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. यात ९५ टक्के लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बलस्तरातील असतील. तर महत्त्वाचे म्हणजे देशात अतिशय अल्प काळात ६ लाख घरांच्या बांधकामास प्रारंभ देखील झालेला आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ०२४ लाभधारक सहभागी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. भारतातील गरिबांसाठी सामाजिक सुरक्षेचे कवच असलेली, जन सुरक्षा असलेली ही लाभदायक अशी योजना आहे. देशपातळीवर या योजनेमध्ये १३ मे २०१६ अखेर ९ कोटी ४३ लाख लोकांची नोंदणी झाली आहे. केवळ १२ रु पये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असणाऱ्या या योजनेची बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या अंमलबजावणी करण्यात येत आहे.१८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्र मांकाद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहील. या योजनेत विमा संरक्षण हे ३0 जून ते ३१ मे अशा एक वर्षाच्या काळासाठी लागू असते.
जिल्ह्यात ३ हजार ३६ घरांना आॅनलाइन मंजुरी
By admin | Updated: October 11, 2016 03:18 IST