कर्जत : गेल्या वर्षीपासून बंद असलेली हमी भावाने भात खरेदी पुढील १० दिवसात करावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते. कर्जत तालुक्यात हमी भावाने भाताची खरेदी व्हावी, यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या नेतृत्वाखाली येथील टिळक चौकातून शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला.बाजारपेठेतून मोर्चा शिवाजी पुतळामार्गे कर्जत तहसील कार्यालयावर पोहचला. फाटकाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. हमी भावाने भाताची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने वेअर हाऊस भाडेतत्त्वावर घेवून तेथे भाताची साठवणूक करून ठेवण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निवेदन देताना केली.कारण जिल्हा फेडरेशनने यापूर्वी खरेदी केलेला हमी भाव यातील भात आजही पडून आहे,हे निदर्शनात आणून दिले.यावेळी बोलताना आमदार सुरेश लाड पुढे म्हणाले, हमी भावाने भाताची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने वेअर हाऊस भाडेतत्त्वावर घेवून तेथे भाताची साठवणूक करून ठेवण्याची मागणी आमदार सुरेश लाड यांनी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना निवेदन देताना केली. आमचे सरकार होते तेव्हा आम्ही हमी भावाने भाताची खरेदी केंद्रे सुरु व्हावीत म्हणून प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती. आताच्या सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या आमदारांना सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही असे मागील वर्षीपासून दिसून आले आहे. भाताची हमी भावाने खरेदी व्हावी,असे सत्ताधारी पक्षाला वाटत नाही कारण त्यांना व्यापारी वर्गाला खूश ठेवायचे आहे, असा आरोप करताना आमदार लाड यांनी खालापूर येथे पकडलेली डाळ गेली कुठे?असा सवाल केला. मोर्चामध्ये पक्षाच्या जिल्हा किसान भारतीचे अध्यक्ष तानाजी चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य एकनाथ धुळे,कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा बांगारे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादीची तहसीलवर धडक
By admin | Updated: November 23, 2015 01:22 IST