म्हसळा : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ (महाराष्ट्र शाखा) शी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे म्हसळा तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजनेचे पुनरुज्जीवन करणे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे व राष्ट्रीय शिक्षक आयोगाची स्थापना करणे या प्रमुख मागण्यांसाठी म्हसळा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.या मोर्चामध्ये रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते, जिल्हा उपाध्यक्षा गीतांजली भाटकर, ज्येष्ठ सल्लागार शुभदा दातार, कैलास कळस, अध्यक्ष म्हसळा संघ तानाजी तरंगे, प्रकाश खडस, संजय म्हात्रे, प्रकाश मांडवकर, संजू पवार, विजय घाटगे, महेश पवार,राम राहाटे, महादेव पवार, मच्छिंद्र खेमनार, माणिक पवार, रमेश जाधव, दिलीप पवार, विद्यानंद वानखेडे यांच्यासहित शेकडो प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. सरकारने नवी पेन्शन योजना सुरू केल्यापासून या संघटनेचा या योजनेला विरोध आहे व जुन्या पेन्शन योजनेचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने या संघटनेने तयार केलेला मसुदा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता. परंतु अद्यापही याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. सरकारने एकदम तटस्थ भूमिका घेतल्याने व नवीन पेन्शन योजनेमुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, तसेच शिक्षकांचे भविष्य हे त्यांच्या निवृत्तीनंतर अंधारात ढकलले जाण्याची शक्यताच अधिक आहे. (वार्ताहर)
म्हसळ्यात शिक्षकांचे आंदोलन
By admin | Updated: April 27, 2017 00:01 IST