खोपोली : खोपोलीत सहकारनगर, वर्धमान परिसर, भानवज गाव, काटरंग परिसर, चिंचवली, विहारी, सुभाषनगर या भागात विकासक डोंगर पोखरून टोलेजंग इमारती उभारत आहेत. येथे नियमबाह्य बांधकामे सुरू असल्याचे दिसत असले तरी खोपोली नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. शहराला लागून असलेल्या डोंगररांगालगत अवैधरीत्या डोंगर फोडून जागा सपाट केल्या जात असून या ठिकाणी रहिवासी संकुले उभारली जात आहेत. दोन वर्षापूर्वी काजूवाडी व सुभाषनगर येथे दरडी कोसळण्याची स्थिती निर्माण झाल्याने केंद्रीय भूगर्भ संशोधन विभागाच्या पथकाने पाहणी करून दिलेल्या अहवालात येथे नवीन बांधकामे करताना अटी-शर्ती पालन केल्याशिवाय परवानगी न देण्याच्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन नगरपालिका प्रशासन व येथील विकासकही करीत नसल्याचे समोर आले आहे. एका जागेसाठी पालिकेची परवानगी घेऊन त्या परवानगीच्या नावाखाली बिनधास्त त्यापुढील जागांवर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. काजूवाडी डोंगराला लागून एका विकसकाचा दोनशेहून अधिक घरे असलेला रहिवासी प्रकल्प उभा राहत आहे. त्याकरिता डोंगर फोडल्याचे स्पष्ट दिसत असूनही कारवाई होत नाही. (वार्ताहर)शहराला लागून असलेल्या डोंगरालगत बांधकाम करण्यासाठी परवाना मिळण्यासाठी विशेष नियमांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून कारवाईसह इमारत पूर्णत्वाचा परवाना देताना पुनर्विचार केला जाईल .-डॉ. दीपक सावंत, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका
टोलेजंग इमारतींसाठी पोखरले डोंगर
By admin | Updated: March 4, 2016 01:49 IST