पनवेल : मोबाइल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे प्रत्येक हातात आज मोबाइल दिसू लागला आहे. कोणे एकेकाळी आजूबाजूला दिवसभर गर्दीत अडकलेले कॉईन बॉक्स आज सहजासहजी सापडत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. टेलिफोन निगमची निर्मिती होण्यापूर्वी डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशन (डी. ओ. टी.) ही केंद्र सरकारची कंपनी अस्तित्वात होती. साधारणत: १९८८ च्या आसपास कॉईनबॉक्स सुविधा सुरू झाली. एक रुपयात कॉलची सुविधा देणारा हा बॉक्स नाक्यानाक्यांवर दिसू लागला. एवढेच नव्हे तर विविध प्रकारची दुकाने, रुग्णालये, हॉटेल्स, विविध कार्यालये, मेडिकल स्टोअर्स, बसस्थानके,रेल्वेस्थानके या ठिकाणी हमखास कॉईनबॉक्स दिसायचा. १९९६ मध्ये मोठ्या शहरात मोबाइलने पदार्पण केले. दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणत अल्पावधीत सारे विश्व व्यापून टाकत सर्वच वयोगटात गळ्यातील ताईत बनला. लोकांना आता संपर्कासाठी बाहेर जाण्याची गरजच उरली नाही. कॉईनबॉक्सच्या समोर जाऊन एक रुपयाचे नाणे टाकून कॉलची करावी लागणारी प्रतीक्षा आता कुणालाच नको होती. यापेक्षा झटपट आणि स्वस्तात मोबाइलवरून कॉल होऊ लागल्याने लोकांनी कॉईनबॉक्सकडे पाठ फिरवली. आता तर व्यक्ती तितके मोबाइल तेही एकापेक्षा जास्त झाल्याने तर कॉईनबॉक्स काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागले आहेत. एखाद्या वेळी कुणी अडचणीत सापडला, दुर्दैवाने त्याचा मोबाइलही (एकमेव असेल तर) अचानक खराब झाला किंवा त्याला तातडीने फोन करण्याची गरज आहे, अशावेळी त्याला कॉईनबॉक्सची आठवण होते. मात्र, पूर्वी पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली येथे अगदी नाक्यानाक्यावर हमखास दिसणारे कॉईनबॉक्स गायब झाल्याने तो शोधण्यासाठी यातायात करावी लागते. कॉईनबॉक्सची संख्या रोडावण्याचे आणखी दुसरे कारण म्हणजे मोबाइलपेक्षा कॉलरेट जास्त आणि व्यवसाय होवो न होवो, पण महिन्याला त्याचे ठरावीक भाडे द्यावेच लागत असल्याने अनेक कॉईनबॉक्सधारकांना ते परवडणारे नसल्याने अनेकांनी कॉईनबॉक्स बंद करून टाकले. आता पनवेल आणि सिडको वसाहतीत काही ठिकाणी कॉईनबॉक्स ठेवण्यासाठी असलेल्या रिकाम्या जीर्ण पेट्या त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत तशाच पडून आहेत. सध्या पनवेल परिसरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कॉईनबॉक्सची संख्या शिल्लक राहिली आहे. नवीन पनवेलमध्ये शिवा संकुल येथे फक्त हा कॉईनबॉक्स दिसतो. एसटीडी, पीसीओची अवस्थाही याहून वेगळी नाही. आता मोबाइलवर सर्वच सुविधा उपलब्ध झाल्याने पनवेलमधील एसटीडी, पीसीओची संख्याही अतिशय कमी झाली आहे. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात फक्त एकच बुथ दिसतो. या ठिकाणी पूर्वीसारखा व्यवसाय नसल्याने मोबाइल रिचार्ज, मनी ट्रान्सफर यासारखे दुसरा जोडव्यवसाय सुरू केले असल्याचे उमेश देशमुख या बुथचालकाने सांगितले. (वार्ताहर)
मोबाइलमुळे कॉईन बॉक्सची संख्या रोडावली
By admin | Updated: August 30, 2015 23:49 IST