तलासरी : डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी तलासरी तालुक्यातील विविध खात्याच्या प्रमुखांची आढावा बैठक घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा केली. या आढावा बैठकीला तहसीलदार गणेश सांगळे, गटविकास अधिकारी राहुल धूम इत्यादींसह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्र शासनाच्या विमा योजनेबाबत चर्चा करण्यात आली. १२ रूपये भरून दोन लाखाचा विमा विद्यार्थ्यांचा उतरविला जातो. या योजनेचा आदिवासी भागातील आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच गरोदर मातांसाठी असलेल्या योजनांचा त्यांना लाभ देऊन सुदृढ बालकांना जन्म देऊन कुपोषण रोखण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. अंगणवाडी सेविका, बचतगटाचे प्रश्न, तसेच आदिवासी शेतकऱ्यांचा आंबा मोहर करपला त्यांना नुकसानभरपाई मिळवून देणे, शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आदिवासी शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्याची अडचण होती. परंतु आता जवळपास तलासरी तालुक्यातील ४० हजाराच्या वर आदीवासींची व २२ हजार विद्यार्थ्यांची बँकांत खाती उघडली गेली असल्याने ती अडचण दूर झाल्याचे सांगण्यात आले. या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र इत्यादीकडे जाण्यास रस्ते नाहीत, बहुतांश जिल्हा परिषद शाळांत विद्युत पुरवठा नाही, काही शाळांचा व आरोग्यकेंद्रांचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे बंद करण्यात आला आहे. तो पुन्हा सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. (वार्ताहर)
तलासरीचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक
By admin | Updated: August 30, 2015 21:35 IST