मोखाडा : मोखाड्याचे सुपुत्र व संगमनेर येथील अमृतवाहिनी फार्मासी कॉलेजात प्राध्यापक असलेल्या देशराज चुंभळे यांनी त्यांच्या प्रबंधातून रानभेंडी या वनस्पतीतील औषध म्हणून उपयुक्त असणारे घटक शोधून काढून त्यांचा कावीळवरील औषधी म्हणून उपयोग सिद्ध केला आहे. त्यांनी या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये ३ शोधनिबंधदेखील प्रसिद्ध केले आहेत.मोखाडा बाजारपेठेतील कपड्यांचे व्यापारी श्यामकांत चुंभळे यांचे चिरंजीव देशराज चुंभळे यांना विनायका मिशन्स युनिव्हर्सिटी, सेलम, तामिळनाडू या विद्यापीठातून या संशोधनाबद्दल फार्मासीमध्ये पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. चुंभळे हे अमृतवाहिनी फार्मासी महाविद्यालयात २००७ पासून फार्माकॉलॉजी या विषयाचे प्राध्यापक असून त्यांनी एम.फार्म.मध्ये सुवर्णपदकदेखील पटकाविले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय चौधरी यांनी अभिनंदन केले, तर मोखाड्यासारख्या दुर्गम भागातून प्रथमच पीएच. डी. पदवी प्राप्त केली असल्याने सर्व मोखाडावासीयांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (वार्ताहर)
रानभेंडीत आढळले औषधी घटक
By admin | Updated: July 25, 2015 22:23 IST