म्हसळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार महादेव पाटील यांची गुरु वारी म्हसळा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. एकूण पाच वेळा सभापती म्हणून निवड होण्याचा हा त्यांचा विक्रम आहे. तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी नीलम गाडे, नायब तहसीलदार भिंगारे उपस्थित होते.दुपारी २.१५ वाजता महादेव पाटील यांची सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर करताच महादेव पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अली कौचाली, तालुका अध्यक्ष अनंतराव सावंत, मावळते सभापती नाजिम हसवारे, नगराध्यक्ष दिलीप कांबळे, उपसभापती अनिता खडस, पं.स.सदस्या प्रियंका शिंदे, शहर अध्यक्ष रियाज घराडे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका अध्यक्ष अनंतराव सावंत यांनी महादेव पाटील यांचे स्वागत करून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अली कौचाली यांनीही शुभेच्छा देऊन सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करण्याचे आवाहन केले. यासाठी पक्षाकडून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी पाटील यांना दिले. (वार्ताहर)
म्हसळा सभापतीपदी महादेव पाटील यांची निवड
By admin | Updated: October 28, 2016 03:44 IST