महाड : महाड शहर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील काळीज येथे एका घरात घुसलेल्या चौघा चोरट्यांनी महिलेला बेदम मारहाण करून घरातील नऊ हजार रूपयांची रक्कम चोरून नेत असताना नागरिकांनी दोघा चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी संध्याकाळी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.काळीज येथील कदम यांच्या घरात कल्पना संदीप ननावरे या भाड्याने राहतात. रविवारी सायंकाळी, त्यांच्या घराबाहेर चार व्यक्ती आल्या व त्यांनी आम्हाला दादाला लग्नाची पत्रिका द्यायची असे सांगून चौघेजण घरात शिरले. त्यातील एकाने कल्पना यांचे तोंड दाबून धरले तर दुसऱ्याने त्यांचे हात धरून कपाटाच्या चाव्या मागितल्या मात्र चाव्या देण्यास कल्पना यांनी नकार दिल्याने त्यांनी त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यावेळी कपाटातील नऊ हजार रूपये रोख रक्कम चोरून चौघांनी पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या कल्पना यांनी आरडाओरड केल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून त्यापैकी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर दोघेजण मात्र पसार झाले. शैलेश तिलोरे (रा.कळवा, ठाणे), राकेश ठाकूर (रा. मध्यप्रदेश) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (वार्ताहर)
महाडमध्ये महिलेला मारहाण करून चोरी
By admin | Updated: May 24, 2016 01:53 IST