बोर्लीपंचतन : येथील ग्रामदैवत चिंचबादेवी मंदिर परिसरात रविवारी (४ आॅक्टोबर) बिबट्या फिरताना मंदिरातील पुजारी दिनेश गायकर यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यानंतर शेतामधून राजेशाही थाटात बसलेला व फिरताना ही अनेक शेतकऱ्यांनी पाहिल्याने बोर्लीपंचतन परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.सकाळी सव्वासातच्या सुमारास बोर्ली पंचतन ग्रामदैवत चिंचबादेवी मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरामध्ये गेले होते. पूजा करीत असताना मंदिराच्या गेटजवळ बिबट्या उभा असलेला पाहिल्यानंतर ते भयभीत झाले. मंदिर वस्तीपासून थोडे बाजूला असल्याने पुजारी घाबरले व मंदिरात एकटे असल्याने त्यांनी तत्काळ मंदिराचे दरवाजे लावून घेतले. मंदिरातील विद्युत ढोल सुरू केला. त्या आवाजाने बिबट्या तेथून पळाला. त्याच दरम्यान शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना झालेली हकिकत पुजाऱ्याने सांगितली. त्यातील काहींनी हाच बिबट्या एका शेताच्या बांधावर बसल्याचे पाहिले. काही वेळानंतर हाच बिबट्या कापोली-शिस्ते गावाकडील बाजूस पळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. (वार्ताहर)
बोर्ली-पंचतनमध्ये बिबट्याचा वावर
By admin | Updated: October 5, 2015 23:53 IST