वैभववाडी : सांगलीतील ‘नेचर केअर सेंटर’मार्फत आरोग्य सेवा देण्याचा आभास निर्माण करून डॉ. रवींद्र वाळके याने काही प्राध्यापक व नोकरदारांना लाखोंचा गंडा घातला आहे. त्याने आयुर्वेदिक औषधे व उपकरणे पुरविण्याच्या बहाण्याने ठरावीक रक्कम उकळून पोबारा केला आहे. वाळके याने जिल्ह्यात अन्य ठिकाणीही अशाचप्रकारे अनेकांना गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे.पलूस (जि. सांगली) तालुक्यातील अंकलखोप हे आपले गाव आहे. आपण ‘नेचर केअर सेंटर’ सांगली येथे चालवितो. या संस्थेच्या माध्यमातून विविध आजारांवर आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात, असे भासवून वैभववाडीत काही लोकांना दृष्टी दोष कमी करणे, वजन घटविण्याची उपकरणे देऊन पैसे घेतले. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधे पुरविण्यासाठी हजारांच्या पटीत प्राध्यापक, तसेच नोकरदारांना हेरून पद्धतशीरपणे गंडा घातल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. डॉ. रवींद्र वाळके याने ७७६९९८४७८७ हा मोबाईल नंबरही ग्राहकांना दिला होता. तो परत न आल्याने काहींनी संपर्क साधला असता त्याने कधी कणकवली, तर कधी कोल्हापूर- सांगलीत असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर त्याचा तो नंबरही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे येथील लोकांच्या लक्षात आले. वाळके याने जिल्ह्यातही अनेकांना अशाच पद्धतीने गंडा घातला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. फसवणूक झालेले काही लोक ‘त्या’ वाळकेविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य सेवेच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
By admin | Updated: September 25, 2014 23:32 IST