सिकंदर अनवारे लोकमत न्यूज नेटवर्क महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे या परिसरातील जैवविविधता, ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे कामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्यंतरीच्या रायगड प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन येथे सरकारने कोट्यवधी खर्च केले आहेत. याद्वारे शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या करण्याचा प्रयत्न होता. परंतु आता येथे पर्यटक, शिवभक्तांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा तयार करणे, पाणी योजना राबविणे आदी कामांवर भर देण्यात आला आहे. मात्र स्थानिकांसह अन्य काही व्यावसायिकांनी येथे टोलेजंग इमारती बांधण्यासाठी, हॉटेल व्यवसाय उभे करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू केले आहे. यामुळे हिरकणी वाडीसह अन्य गावांना भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड परिसरातील नेवाली, हिरकणी वाडी परिसरात तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार भूगर्भशास्त्र विभागाने काही उपाय सुचवले होते, अशी माहिती पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी दिली.
...तरीही उत्खनन का? किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडीमध्ये काही वर्षांपूर्वी जमिनीला भेगा गेल्या होत्या. रस्ता खचला होता. सातत्याने या ठिकाणी महसूल प्रशासन लक्ष देऊन आहे. भूगर्भशास्त्र विभागाने याची पाहणी केल्यानंतर हा भाग धोकादायक असल्याचे सांगितले.
रायगड परिसरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा आणि उत्खननांवर कारवाई करण्यात येईल. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी, महाड
किल्ले रायगड परिसरातील १००, २०० आणि ५०० मीटरपर्यंतचा भाग संरक्षित भाग आहे. किल्ला, परिसराला हानिकारक असे उत्खनन होत असेल ते थांबविणे हे काम पुरातत्त्व संशोधन विभागाचे आहे. वरुण भामरे, वास्तुसंवर्धक, रायगड प्राधिकरण
रायगड किल्ला आणि परिसराचा विकास होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र निसर्गसौंदर्याला बाधा होऊ न देता विकास झाला तर उत्तम. मात्र उत्खनन, टोलेजंग इमारती होत असतील तर ऐतिहासिक महत्त्व कसे राहील? असा प्रश्न आहे.अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक