उरण : स्वातंत्र्यसंग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके उरण परिसरात उभारण्यात आली आहेत. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मात्र त्याचे उकिरडेच बनले आहेत. त्यामुळे स्मारके आहेत मात्र स्मरण नाही, अशीच खेदजनक स्थिती आहे. स्वातंत्र्यसंग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याचवेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामय रीतीन सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात हजारो आंदोलक सहभागी झाले होते. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट केला. या गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले. तर अनेक जण जखमी झाले. स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे. या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू फोफेरकर, नवश्या कातकरी (चिरनेर), रामा कोळी (मोठी जुई), हसुरा घरत (खोपटे), रघुनाथ न्हावी (कोप्रोली), परशुराम पाटील (पाणदिवे), आनंदा पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात उभारली आहेत. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मारकांचा वापर मुतारी, शौचालय, कपडे, मासळी सुकवण्यासाठी आणि शेतीची अवजारे ठेवण्यासाठी होऊ लागला आहे. त्यामुळे स्मारकाचे उकिरडे झाले आहेत. शासनाकडून नेहमीप्रमाणे देखभाल व दुरुस्तीसाठी निधी नसल्याची बोंब मारली जाते.अशा या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे साजरा केला जातो. यावेळी शासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदनाही दिली जाते. कार्यक्रमासाठी येणारे राजकीय पुढारी, नेते त्यांच्या राजकीय सोईप्रमाणे चिरनेर परिसरात तसेच स्मारकांच्या देखभालीसाठी निधी देण्याची आश्वासने देतात. त्यानंतर कार्यक्रम संपताच दिलेली आश्वासने विसरून जातात. हे आता नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. २५ सप्टेंबर रोजीही चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८५ वा स्मृतीदिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उपस्थित राजकीय पुढारी, नेते यावर्षी कोणतही आणखी न पाळली जाणारी आश्वासने देतात. याकडेच सर्वाधिक नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. (वार्ताहर)
जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारके बनली उकिरडे
By admin | Updated: September 21, 2015 03:32 IST