अलिबाग : मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पुढील ४८ तासांमध्ये जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ सें.मी ते १२ सें.मी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (१२ सें.मी ते २४ सें.मी) अतिवृष्टी होण्याची पूर्वसूचना दिली आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे. अतिवृष्टीमुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या व पूर परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिले आहेत. कोणत्याही स्वरुपाची आपत्ती आल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष फोन-०२१४१-२२२११८/२२२०९७ वा २२२३२२ या क्र मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:37 IST