नागोठणे : विभागातील आमडोशी येथील जमीन मोजण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या रोहे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी रघुवीर गणपत पाटील यास पैसे स्वीकारताना अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुनील कलगुटकर यांनी बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले.नागोठणे येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीने आमडोशी येथील जमीन मोजण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, रोहे येथे अर्ज दाखल केला होता. त्यावेळी या कार्यालयातील लिपिक रघुवीर पाटील (५३, रा. गुरव आळी, पेण) यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी या व्यक्तीकडे एक हजार रु पयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित व्यक्तीने पाटील यांच्या विरोधात अलिबागच्या रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार नोंदविली होती. या विभागाने तातडीने सूत्रे हलवीत बुधवारी पाटीलला संबंधित व्यक्तीकडून एक हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरडेकर आणि कर्मचारीवर्गाने ही कामगिरी केली. उपाधीक्षक कलगुटकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा गुन्हा लवकरच रोहे पोलीस ठाण्यात दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर )
सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले
By admin | Updated: January 7, 2016 00:53 IST