महाड : रायगड जिल्ह्यातील बँक आॅफ इंडियाच्या माणगाव शाखेला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये अंदाजे ६५ लाखांची मालमत्ता जळून भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. महाड व रोहा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले. स्ट्राँगरूमला या आगीची झळ पोहोचली नसल्याने या बँकेचे कोट्यवधी रुपयांची हानी सुदैवाने टळली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.मुंबई गोवा महामार्गालगत घनश्याम शेठ यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर या बँकेची शाखा असून, अचानक रात्री लागलेल्या आगीमध्ये बँकेतील सर्व फर्निचर वातानुकूलित यंत्रे, सीसीटीव्ही, संगणके तसेच सर्व स्टेशनरी अशी सुमारे ६५ लाख रुपयांची अंदाजित किमतीची मालमत्ता जळून खाक झाली. बँकेचे शाखाधिकारी विलास मयेकर यांनी याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचे वृत्त समजताच डीवायएसपी दत्ता नलावडे, सहा. पोलीस निरीक्षक एम.एल.पेडाम यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीची झळ अन्य दुकानांना पोहोचली नसल्याने मोठे नुकसान टळले. अशा प्रकारच्या आगीच्या घटनांपासुन बचाव करण्यासाठी नगरपंचायतीने स्वत:ची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
बँक आॅफ इंडियाच्या शाखेला आग
By admin | Updated: June 2, 2016 01:36 IST