दासगाव (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई दिशेला जाणाऱ्या एका जीपने दासगावकडे येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेला जाऊन जोराची धडक दिली. या अपघातात महाड तालुक्यातील टोळ या गावातील राहणारे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले.शनिवार, २९ एप्रिल रोजी रात्री गणेश परब हे जीपने मुंबईला जात होते. त्या वेळी दासगाव खिंडीमध्ये रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक देत काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये अझहर इनायसतुल्ला जलाल (४३), कैफअझहर जलाल (१४) हे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. तर दुचाकीचा चुराडा झाला. जखमींना स्थानिकांनी महाडमध्ये एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यास सांगितले आहे. अपघातानंतर जीपचालक गणेश परब याने गाडीसह मुंबई दिशेने पलायन केले. मात्र, स्थानिकांनी घेतलेल्या नंबरवरून पोलिसांनी सापळा रचून माणगाव येथे वाहनचालकास गाडीसह ताब्यात घेतले. (वार्ताहर)
अपघातात पिता-पुत्र जखमी
By admin | Updated: May 1, 2017 04:38 IST