आगरदांडा : केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रयत्नातून सिमलेस कंपनीकडून मुरु ड नगरपरिषदेस ३० लाखांपेक्षा जास्त रकमेचे अनुदान प्राप्त झाले असून विश्राम बागेशेजारी असणाऱ्या जागेशेजारी शौचालय व चेंजिंग रूम चे काम सुरू होणार आहे. याला आघाडीच्या सात नगरसेवकांनी विरोध केला असून याबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिले आहे. सातही नगरसेवकांनी या ठिकाणी चेंजिंग रूम चालेल, परंतु शौचालय होऊ नये, अशी मागणी केली आहे. विश्राम बागेशेजारील जागा येथे पर्यटक व स्थानिक नागरिक यांची जास्त वर्दळ असून शौचालयाच्या वासाचा पर्यटकांना त्रास होऊ शकतो यासाठी या ठिकाणी शौचालय नको, अशी आग्रही मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना केली आहे.याबाबतचे निवेदन विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांच्या हस्ते मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक अविनाश दांडेकर, आशिष दिवेकर, मनोज भगत, विश्वास चव्हाण, नगरसेविका आरती गुरव, महादेव कोळी समाज अध्यक्ष व सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, उमेश दांडेकर, बाबू आंबुकर आदी उपस्थित होते.विरोधी पक्षनेते व मुरु ड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितले की, आलेला निधी खर्च करण्याबाबत आमचे दुमत नाही. पर्यटकांना सुविधा या मिळाल्याच पाहिजे असे सर्वांचे एकमत आहे. शौचालय व चेंजिंग रूमसाठी विश्राम बागेशेजारील जागा अनुकूल नाही. येथे चेंजिंग रूम व्हावे यास आमचे दुमत नाही, परंतु जर या ठिकाणी शौचालय झाले तर पर्यटकांना घाणीचा वास सहन करावा लागून याचा परिणाम पर्यटकांची संख्या रोडावली जाऊ शकते. कारण विश्राम बाग हे मुख्य ठिकाण असून याच ठिकाणी पर्यटकांची लहान मुले,व ते स्वत: निसर्गाचा आनंद घेत असतात. अशा वेळी या ठिकाणी शौचालय झाल्यास दुर्गंधीच्या वासाने सर्वांनाच त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच समुद्राच्या अगदी शेजारी बांधकाम झाल्याने पाणी जास्त प्रमाणात जिरू शकत नाही. याचा परिणाम दुर्गंधीच्या रूपात होऊन काही काळाने भयंकर त्रास होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. (वार्ताहर)
मुरुड समुद्रकिनारी शौचालय बांधू नका
By admin | Updated: April 28, 2017 00:22 IST