लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यामध्ये माथेरान मिनीट्रेन, महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबवणे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे हे पहिल्यापासूनच आक्र मक आहेत. त्यांनी संसदेत मावळ लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये पुणे-लोणावळा तिसरा ट्रॅक सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूदही केली आहे. माथेरान येथील ऐतिहासिक असलेली मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे विभागाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेऊन या मिनी ट्रेनसाठी नवीन इंजिन खरेदीही केले व साडेचार कोटी रुपये खर्च करून रेल्वे ट्रॅकची दुरुस्तीही पूर्ण केली असून येत्या पंधरा दिवसात माथेरानची ऐतिहासिक मिनीट्रेन पुन्हा धावू लागणार आहे. याचबरोबर कर्जत- पनवेल नवीन लोकल ट्रेन चालू करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या अनेक अडचणी असून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक मागण्या व तक्र ारी नागरिक करीत असतात. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. याबाबत बारणे म्हणाले की, मी रेल्वेच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करीत आहे. रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काही जुन्या मागण्यांबाबत चर्चा करून काही नवीन मागण्याही रेल्वेमंत्र्यांना सादर केल्या आहेत. त्यात चिंचवड ते रोहा हा कोकण मार्गाला जोडणारा नवीन रेल्वे मार्गाचा सर्व्हे सन २००८ - २००९ मध्ये झाला असून या मार्गाच्या प्रश्नाला गती देण्याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर पनवेल व लोणावळा स्टेशन आधुनिकीकरण करणे, पुणे-लोणावळा तिसऱ्या ट्रॅकला गती देणे, नागरिकांच्या मागणीनुसार दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या चिंचवड, पनवेल या स्टेशनवर थांबविणे, चिंचवड येथे सब-जंक्शन करण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्याचे बारणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
By admin | Updated: May 13, 2017 01:03 IST