पाली : सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचे आदेश सरकारने दिले. पाली ग्रामपंचायत बरखास्त होऊन तिचे रूपांतर काही दिवसांपूर्वीच नगरपंचायतीत झाले, मात्र पाली शहराची स्थिती पाहिली असता मुख्य बाजारपेठ सोडल्यास संपूर्ण पाली शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे.बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगरामध्ये दोन- दोन दिवस कचरा उचलणारी गाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहे. या परिसरात मच्छर, माशांचे प्रमाण वाढल्याने तसेच दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच नगरातील मुख्य रस्त्याला लागून तसेच पाली ग्रामपंचायतीच्या काही माजी सदस्यांच्या घरासमोर हे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पाली नगर पंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणारे तहसीलदार व्ही. के. रौदळ यांनी पालीकरांच्या या समस्येकडे लक्ष देऊन पाली शहर कचरामुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
पाली शहरात घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: July 31, 2015 22:46 IST