अलिबाग : तळा नगरपंचायत गेल्या २६ जून २०१५ रोजी अस्तित्वात आली. त्यास येत्या जून महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. परंतु नगरपंचायतीच्या विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असणारे ‘अभियंता’ हे पद नगरपंचायत स्थापनेपासूनच रिक्त असल्याने अनेक समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागत असल्याची खंत तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, नवीन इमारतींना पूर्णत्वाचे दाखले देणे, नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडची निर्मिती आदी अनेक महत्वाची कामे अभियंत्यांअभावी करता येत नसल्याने, उपलब्ध निधीचा वापर करणे देखील अशक्य होत असते. या समस्येच्या निराकरणाकरिता जिल्हा स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येवून देखील शासनाने निर्णय घेतलेला नाही,असेही मुंढे यांनी सांगितले.जिल्ह्यातील नव्याने झालेल्या सर्वच नगरपंचायतींमध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतींचा कर्मचारी वर्ग हाताशी घेऊन नगरपंचायतीचा कारभार करावा लागत असल्याची व्यथा मुंढे यांनी सांगितली. तळा नगरपंचायतीकरिता प्रस्तावित सात अधिकारी संवर्गातील व १३ कर्मचारी अशी एकूण २० पदे आहेत, ती सर्व अद्याप रिक्त असल्याचेही यांनी लक्षात आणून दिले. तळा नगरपंचायत स्थापन झाल्यावर आतापर्यंत रोहा नगरपरिषद, शिक्षक मतदार संघ आणि जिल्हा परिषद निवडणूक या तीन निवडणुकांमूळे तब्बल सहा महिन्यांचा कालावधी आचारसंहितेचा गेल्याने, या काळात नवीन कोणतेही विकासकाम करणे शक्य झाले नाही. दरम्यान, उपलब्ध २० लाखांच्या रस्त्याचे कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अभियंता नसल्याने विकासकामांत अडचण
By admin | Updated: April 28, 2017 00:28 IST