- लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. रानकडसरी टोकानजीक पोलादपूरहून अंदाजे १९ ते २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. गतवर्षी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्ते उखडले गेले. पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात गटारांची कामे यंदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खराब झाला आहे. हा मार्ग दऱ्याखोऱ्यांतून जात असून, पाण्याचा निचरा होत नसल्याने ते गटारात अथवा रस्त्यावर साचते. त्यामुळे दरड कोसळून रस्ता खचण्याची शक्यता वाढली आहे.गेल्या वर्षी पावसाळ्यात पडलेली दरड अजूनही रस्त्याच्या कडेला तशीच आहे. मातीचा भराव रस्त्याच्या कडेला तसाच असल्याने वाहतुकीला अडथळा होण्याची शक्यता आहे.आंबेनळी धबधब्याजवळ गेल्या वर्षी मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्त्यालगतची मोरी बंद होऊन सर्व पाणी रस्त्यावर आल्याने खालच्या बाजूचा रस्ता खचला होता. त्याची दुरुस्ती न केल्याने पहिल्याच पावसात रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. येथील पाण्याचा निचरा व्यवस्थित न केल्यास रस्ता पूर्णपणे खचेल आणि पोलादपूर-महाबळेश्वर वाहतूक बंद होईल, अशी भीती वाहनचालकांकडून वर्तवण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रोग्राम मंजूर नसल्याने काम करता आले नसल्याचे कारण देऊन पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत.- उपअभियंता देवकाते यांच्याशी संपर्क साधला असता, पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याची मोरी व गटार काढण्यासंदर्भात विचारणा केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, मंजुरी मिळाली नसल्याची माहिती दिली. मात्र कामे न झाल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होऊन पर्यटकांना त्रास होणार आहे.
पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याची पहिल्याच पावसात दैना
By admin | Updated: June 18, 2017 02:09 IST