नेरळ : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शिवाजी शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कर्जत पंचायत समितीचे शिवसेनेने सदस्य राहुल विशे यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोठात खळबळ माजली आहे. पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आर्ढे येथे गोल्डन वन साइड सुरू आहे. गोल्डन वन कंपनीने सचिन शेळके यांना बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम दिले आहे. त्या साइटवर पाषाणे गावातील २० ते २५ माणसे जमल्याचे शेळके यांना समजताच ते त्या ठिकाणी गेले असता ही माणसे या कंपनीमध्ये गाड्या भाडे तत्त्वावर लावण्यासाठी आल्याचे समजले. ही माहिती कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशे यांना समजताच तेही साइटवर दाखल झाले आणि शेळके यांना जाब विचारत त्यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी संतापलेल्या विशे यांनी एक वीट शेळके यांच्या डोक्यात मारली. तसेच शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.हल्ल्यात शेळके यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना कर्जत-डिकसळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणी प्रकरणी कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशे यांच्यासह, संगम सावंत, संकेत सावंत, नीलेश येवले, स्वप्निल विशे, गुरुनाथ विशे, अनिल विशे, सचिन झांजे, विकी विशे व इतर १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. एन. सांगळे हे करीत आहेत.
उपसरपंचावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: April 30, 2017 03:40 IST