अलिबाग : डीमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला आहे. तक्रारदाराला तीस दिवसांमध्ये ८० हजार अधिक तीस हजार असे एकूण एक लाख दहा हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.कर्जत तालुक्यातील वंजारवाडी या गावातील शंकर दामु सोनावणे यांनी २००७ मध्ये टाटा कंपनीचा छोटो टेम्पो खरेदी करण्यासाठी बँक आॅफ इंडीया कर्जत-कडाव शाखेतून ८० हजार रुपयांचा धनाकर्ष काढला होता. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात बरेच महिने राहावे लागले. त्यांना पायाचा कर्करोग झाल्याने दुर्देवाने त्यांचा पाय कापावा लागला. या कालावधीत त्यांच्याकडून धनाकर्ष गहाळ झाला होता. मात्र धनाकर्षाची रक्कम बँकेत तशीच पडून होती.सोनावणे यांनी त्या रकमेची मागणी केली. मात्र बँकेन ती देण्यास नकार दिला. त्यानंतर वकीलांमार्फत सोनावणे यांनी बँकेला नोटील पाठविली तरी देखील बँके नी आपला हेका कायम ठेवला होता. सोनावणे यांनी या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य उल्का पावसकर आणि रमेश बाबू सिलव्हेरी यांच्या समोर सोनावणे यांच्या तक्रारीवर सुनावणी झाली. मंचाने बँकेला दोषी ठरवत सोनावणे यांच्याबाजूने निकाल दिला. सेवा-सुविधा पुरविण्यात बँकेने कसुर केल्याचे मत मंचाने नोंदविले. बँकेने सोनावणे यांना धनाकर्षाचे ८० हजार रुपये आणि तक्रार खर्च, मानसिक आणि शारिरीक त्रासापोटी त्यासह अन्य खर्चाच्या नुकसान भरपाईपोटी एकत्रीत ३० हजार रुपये असे एकूण एक लाख दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले..ही रक्कम तीस दिवसांच्या आत न दिल्यास बँकेने तक्रारदराला ती रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. सहा टक्के व्याजासह अदा करायची असल्याचे आदेशात म्हटले आहे. तक्रारदाराच्या वतीने अॅड.आर.ए.घट्टे यांनी तर बँकेच्या वतीने अॅड. व्ही.डी.कळके यांनी काम पाहीले. (प्रतिनिधी)
ग्राहक मंचचा बँकेला दणका
By admin | Updated: September 22, 2015 03:46 IST