कर्जत : पूर्वी एसटीखेरीज कोणतेही प्रवासाचे साधन नव्हते. त्याकाळी एसटीची वाट बघत बसावे लागत असे. त्यानंतर खासगी वाहनांनी प्रवास करण्याकडे कल गेला आणि एसटीला वाईट दिवसांचा सामना करावा लागला. असे असले तरी आपल्या ग्रामीण भागातील कर्जत आगाराने महाराष्ट्रात सर्वप्रथम मान मिळविला हे खरोखरच भूषणावह आहे. कितीही खासगी वाहने असली तरी विश्वासार्हता व सुरक्षितता मात्र एसटी प्रवासामध्येच आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा सुनंदा कांगणे यांनी येथे केले.एसटी सुरु होऊन आज ६९ वर्षे झाली. त्या निमित्ताने कर्जत आगारामध्ये ६८ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्षा सुनंदा कांगणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. आगार प्रमुख डी. एस. देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनंत म्हात्रे यांनी प्रास्ताविकात आगाराच्या उत्कर्षाची सविस्तर माहिती सांगितली. या प्रसंगी प्रवासी सुरेखा कराळे, सुनंदा कडू, साजिदा पठाण, रामू कराळे, दिना यादव यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कर्जत आगाराच्या भरभराटीसाठी योगदान दिलेल्या एसटीचे चालक, वाहक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मारु ती हेलोंडे, भालचंद्र लाड, डॉ. उषा राठोड, नीलिमा विसपुते, पुंडलिक भोईर आदींनी आपले विचार मांडले. मधुसूदन फडके यांनी स्वरचित काव्य सादर करू कर्जत आगाराची महती व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डी. एस. देशमुख यांनी यापुढेही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा बोलून दाखवली. या प्रसंगी माजी नगरसेवक पुंडलिक भोईर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा राठोड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
विश्वासार्हता व सुरक्षितता एसटीच्या प्रवासामध्येच
By admin | Updated: June 2, 2016 01:31 IST