अलिबाग : जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्यामार्फत ८२४ ग्रामपंचायतीमधील ६ हजार जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींपैकी ७२१ ग्रामपंचायतींत जलस्रोत शुद्ध निष्पन्न झाल्याने त्यांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. १०३ ग्रामपंचायतींमधील जलस्रोतांची परिस्थिती मध्यम जोखीमग्रस्त असल्याने त्यांना पिवळे कार्ड दिले. एकाही ग्रामपंचायतीला धोकादायक स्रोत म्हणून लाल कार्ड द्यावे लागले नसल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. साळुंखे यांनी दिली.जनतेला शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. वर्षातून दोनदा पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पाण्याचा स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. (प्रतिनिधी)
स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यात ७२१ गावांतील जलस्रोत शुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 23:44 IST