महाड : तथागत गौतम बुध्दांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. महाड शहरानजीक असलेल्या कोल गावातील बौध्द लेण्यांच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या वेदा जनजागृती या संस्थेमार्फत कोल ग्रामस्थांच्या सहकार्यातून बुद्धजयंतीनिमित्त संपूर्ण लेण्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रविवारपासून सुरू करण्यात आलेली ही स्वच्छता मोहीम दर रविवारी केली जाणार असल्याची माहिती डॉ. दिगंबर गीते यांनी दिली.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्त सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. कोल गावाच्या वरील बाजूस दुर्लक्षित अशा लेण्या आहेत. अन्य बाजूला असलेल्या लेण्यांमध्ये तीनच खोल्या आहेत, तर वरील बाजूस असलेल्या या लेण्यांमध्ये चार खोल्या आहेत. सर्व लेण्या मातीने पूर्णपणे बुजलेल्या आहेत. त्याठिकाणी असलेल्या तीन शिलालेखांपैकी दोनच शिलालेख सध्या दिसत आहेत. सभागृह तसेच इतर खोल्याही माती व दरडीमुळे बुजल्याने त्या नष्ट होवू लागल्या आहेत. या लेण्यांची दयनीय अवस्था पाहून वेदा जनजागृती आणि कोल ग्रामस्थांनी या लेण्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे. लेण्यांच्या गुहांमध्ये साचलेली मातीचा गाळ काढून लेण्यांची स्वच्छता करण्याचा विचार पुढे आला. यापुढे दर रविवारी ही स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत वेदा जनजागृतीचे डॉ. गीते यांच्यासह संजय चिखले, भाईदास शिरसाठ, मोरेश्वर धामणसे, अक्षय वाडीकर, विनोद बाटे आदि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
कोल ग्रामस्थांनी केली बौध्द लेण्यांची स्वच्छता
By admin | Updated: May 24, 2016 01:45 IST