माथेरान : मनुष्य जन्मात काय साध्य करावे अन् कशाप्रकारे आलेल्या संकटांना सामोरे जाऊन आपले अनमोल जीवन अध्यात्माचा ध्यास घेऊनच मार्गी लावावे. या कलियुगात सत्ययुगाचे दर्शन कसे प्राप्त करता येऊ शकते यासाठी दरवर्षीप्रमाणेच याही वेळी ६ ते १४ मेपर्यंत येथील नगरपालिकेच्या असेंब्ली हॉलच्या प्रांगणात मोफत जीवन परिवर्तन आध्यात्मिक जत्रेचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या विद्यमाने केलेले आहे. या जत्रेस स्थानिकांसह पर्यटक देखील गर्दी करीत असून साक्षात अनुभूती घेताना दिसत आहेत.या विद्यालयाच्या जगात एकूण नऊ हजार शाखा कार्यरत असून मुख्य कार्यालय माऊंटअबू येथे आहे. या जत्रेमध्ये व्यसनमुक्ती संदेश, स्त्री भ्रूण हत्या कशाप्रकारे थांबविली जाऊ शकते, तसेच आळशीपणा केल्यावर काय साध्य होते अन् कष्ट केल्यावर काय लाभ होतो, मनुष्याच्या जीवनात सुख आणि शांतीसाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे, परंतु हे सर्व आपल्याच कर्मावर अवलंबून आहे याबाबत याच आयोजनातील मुले, मुली सुंदर प्रकारे नाटके सादर करीत आहेत. देवदेवतांना स्मरण करण्यासाठी कशाप्रकारे पूजाअर्चा करून मन:शांती मिळते याचेही ज्ञान समन्वयक सांगत आहेत. हे आठ दिवस पर्यटक आणि नागरिकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी असल्याने तसेच मोफत आहे त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे.
माथेरानमध्ये जीवन परिवर्तन आध्यात्मिक जत्रेत गर्दी
By admin | Updated: May 13, 2017 01:11 IST