- जयंत धुळप, अलिबाग
भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जात असे व संबंधित व्यक्तीही शिक्षेस पात्र ठरत असे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील आगरी समाजाच्या शहाबाज गावात तत्कालीन आगरी युवकांनी विचार स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने ३ एप्रिल १९१६ रोजी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलनाची मुहूर्तमेढच रोवली. तेच शहाबाज वाचनालय पारतंत्र्य ते स्वातंत्र्य अशा वाचन व विचार चळवळीचा तब्बल १०० वर्षांचा यशस्वी प्रवास यंदा पूर्ण करीत आहे. त्या निमित्ताने शनिवार ७ व रविवार ८ मे २०१६ रोजी याच वाचनालयाचा शतसांवत्सरिक महोत्सव संपन्न होत आहे.पारतंत्र्याच्या काळातील या वाचन चळवळीच्या जन्माची कहाणी मोठी रोचक आहे. शहाबाज गावामध्ये शिक्षणप्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने १८६५ मध्ये मराठी प्राथमिक शाळा सुरु झाली. जनता शिक्षित होऊ लागली. शिक्षणाचा प्रसार वाढू लागला होता. पारतंत्र्याचा काळ होता, सामूहिक वाचनाला बंदी होती. गावातील शिक्षित तरु णांना आपल्या बांधवांना शिक्षणाबरोबर चालू घडामोडी कळाव्यात असे वाटत होते. त्याच प्रेरणेतून १९१० मध्ये गावच्या भैरवनाथाच्या मंदिरात वाचन मंडळाची स्थापना झाली आणि तेथेच वाचन चळवळीचा श्रीगणेशा झाला. वृत्तपत्र वाचनबंदी कायद्याचा भंग करून वृत्तपत्राचे प्रथम वाचन करण्याचे धाडस कमळ पाटील या तत्कालीन विद्यार्थ्यांने केले. म्हणून कमळ पाटील यांना शहाबाज वाचन चळवळीचे जनक मानले जाते. भैरवनाथाच्या मंदिरात जागा अपुरी पडू लागली म्हणून काशी विश्वेश्वराच्या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ३ एप्रिल १९१६ रोजी विठोबा राघोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालय शहाबाज संस्थेची स्थापना झाली. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काशिनाथ पाटील (आर. के. पाटील) यांच्या प्रयत्नाने वाचनालयाची ६ फेब्रुवारी १९२९ रोजी संस्था नोंदणीकृत करण्यात आली. शतसांवत्सरिक महोत्सवाचा शुभारंभभारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर बंदी होती. त्या काळात शहाबाज गावामध्ये शिक्षणप्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने १८६५ मध्ये मराठी प्राथमिक शाळा सुरू केली ही घटना १८५७ च्या बंडा इतकी किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोठी व महत्त्वाची घटना आहे, असे प्रतिपादन ग्रंथाली वाचन चळवळीचे प्रणेते दिनकर गांगल यांनी शनिवारी केले आहे. शहाबाज सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ग्रथालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसांच्या शतसांवत्सरिक महोत्सवाचे उद्घाटन गांगल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.