- आविष्कार देसाई, अलिबागतालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक ३० जूनपर्यंत तयार करण्याचे खारभूमी विभागाने मान्य केले. त्यामुळे खारबंदिस्तीची कामे सुरु होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. खारभूमी विभागाने अंदाजपत्रक तयार करण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा एक प्रकारे विजयच असल्याचे बोलले जाते. खारभूमी विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय नसल्याने यासाठी येणारा सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च जलसंपदा मंत्रालयाच्या तिजोरीतून द्यावा लागणार आहे. श्रमिक मुक्ती दलासोबत गुरुवारी खारभूमी अधिकारी यांची या प्रश्नी बैठक पार पडली.खारभूमी विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले आणि होत असलेले नुकसान भरुन देण्याची मागणी येथील श्ोतकऱ्यांनी संघटितपणे केली आहे. खारभूमी अधिकारी कार्यालयात ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी ठरल्याप्रमाणे गुुरुवारी अर्ज दाखल केले. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार असल्याचे निश्चितपणे मानले जात आहे. खारेपाटातील शेतकरी हा भात आणि मासे यांच्याबाबतीत समृध्द होता. कालांतराने खारभूमी विभागाने खारबंदिस्तीकडे योग्य लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकत्या शेतामध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून तेथील शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे खारभूमी विभागाने भरुन द्यावे, यासाठी शेतकरी संघटित झाले. नुकसानभरपाई प्राप्त करण्यासाठी त्यांनी गुरुवारपासून अर्ज करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ५४१ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली. त्याचप्रमाणे कृषी विभाग, तलाठी, भूमिअभिलेख यांची संयुक्त बैठक लवकरच लावण्यात येणार आहे. कुर्डूस ते हाशिवरे या खारेपाट विभागातील खारबंदिस्तीचे सर्व्हेक्षण करुन कामाचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत करण्यात येईल असे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी सांगितल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याप्रसंगी आर.सी.पाटील, सुनील पाटील, शाखा अभियंता सुरेश शिरसाट यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. ५४१शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी अर्ज अलिबागच्या खारभूमी कार्यालयात दाखल केले. त्याचप्रमाणे खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्याची प्रलंबित असलेली मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी लावून धरली.श्रमिक मुक्ती दलासोबत बैठक पार पडली. खारबंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी दोन योजनांचे अंदाजपत्रक ३० जून २०१६ पर्यंत तयार करण्यात येणार आहे.-एस.पी.पवार, सहायक कार्यकारी अभियंता
खारबंदिस्तीसाठी अंदाजपत्रक
By admin | Updated: May 27, 2016 03:52 IST