नेरळ/माथेरान : माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम माथेरानमध्ये सुरू आहे. माथेरानचे सुपुत्र असलेले आणि १९४३ मध्ये शहीद झालेले भाई विठ्ठलराव कोतवाल यांची प्रतिमा माथेरान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष यांच्या कार्यालयात सन्मानाने लावली होती. त्याशिवाय देशातील महापुरुषांंच्या जोडीने बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा कार्यक्र म करून लावण्यात आल्या होत्या. निवडणूक प्रशासनाने या सर्व प्रतिमा भिंतीवरून खाली उतरवल्या आहेत. दरम्यान, माथेरानची अस्मिता असलेले हुतात्मा भाई कोतवाल यांच्याबाबत प्रशासन असे कसे काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने मल्लिकार्जुन माने यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे कार्यालय माथेरान नगरपालिकेच्या कार्यालयातील नगराध्यक्ष केबिनमध्ये सुरू करण्यात आले आहे. येथे लावलेल्या महापुरूषांच्या प्रतिमा काढण्यात आल्या आहेत.सार्वत्रिक निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना प्रतिमा का काढल्या याबाबत विचारले असता त्यांनी काही राजकीय व्यक्तींच्या देखील प्रतिमा त्यात असल्याने निवडणूक आचारसंहितेनुसार त्या प्रतिमा काढल्या असल्याचे सांगितले. त्याचवेळी शिवाजी महाराज, हुतात्मा भाई कोतवाल, महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी हे राजकारणी होते काय?असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता चर्चा करून निर्णय घेतो, असे मत निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी मांडले.
हुतात्मा भाई कोतवाल यांची प्रतिमा काढली!
By admin | Updated: October 28, 2016 03:46 IST