अलिबाग : अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा कंडक्टर तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यासह पेण तालुक्याचा काही भाग सलग आठ तास अंधारात बुडाला होता. गुरवारी रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी चार वाजेपर्यंत वीज गायब झाल्याने ५० हजार ग्राहकांना याचा थेट फटका बसला. तर आरसीएफ कंपनीला होणारा विद्युतपुरवठाही खंडित झाला होता. रात्रभर घामाच्या धारांनी भिजलेल्या नागरिकांनी एमएसईबीच्या नावाने शंख केला. मात्र पनवेलच्या महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून विद्युतपुरवठा सुरळीत केला. आपटा येथून जिते येथील स्टेशनमध्ये १०० किलोवॅट विद्युतपुरवठा केला जातो. तेथील अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्याच्या टॉवरवरील कंटक्टर तुटला. त्यामुळे गुरुवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा खंडित झाला. विद्युतपुरवठा अचानक खंडित झाल्याने अलिबाग सब स्टेशनमध्ये काही बिघाड झाला का, याची माहिती तेथील अभियंत्यांनी घेतली. परंतु तेथे सर्व ठीक होते. नेमका फॉल्ट कोठे आहे याचा शोध घेण्यास सुमारे तीन तासांचा कालावधी गेला. आपटा परिसरातील काही टॉवर हे डोंगरावर आहेत. त्यांची उंची ही सुमारे ३० मीटर आहे. त्यामुळे नक्की काय झाले हे अधिकारी, कर्मचारी यांना कळू शकले नव्हते. रात्रीच्या सुमारास कंडक्टर बदलणे जिकिरीचे काम होते. त्यामुळे बायपास करून विद्युतपुरवठा जिते स्टेशनपर्यंत पोचविण्यात आला. दरम्यानच्या काळात नागरिकांचे मात्र गरमीने प्रचंड हाल झाले. घराबाहेर, टेरेसवर तर काहींनी मैदानात बसून रात्र जागून काढली. घामाच्या धारांनी बेचैन झालेल्या नागरिकांनी एमएसईबीच्या नावाने ठणठणाट केला. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर नव्याने कंडक्टर बसविण्यात आला. त्यामुळे सायंकाळी पावणेपाच ते सहा वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात आले होते.आपटा परिसरातील १०० किलो वॅट क्षमतेच्या अति उच्च दाबाच्या वाहिनीचा कंडक्टर तुटला होता. सदरचा टॉवर हा डोंगराळ भागात होता. त्यामुळे फॉल्ट शोधून दुरुस्तीचे काम सुरू करण्यास विलंब झाला. मात्र कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टॉवरच्या माध्यमातून बायपास करून वीजपुरवठा सुरळीत सुरू केला.-इब्राहिम कादीर मुलानी,कार्यकारी अभियंता
पेणसह अलिबाग अंधारात
By admin | Updated: May 28, 2016 02:42 IST