अलिबाग : रायगड जिल्ह्यात रोहा, माणगाव, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यांना मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. रोहा व परिसरात तर गारांचा पाऊस झाला. तर वादळी वाऱ्याबरोबर पावसाच्या दमदार सरी पडल्याने रस्ते ओलेचिंब झाल्याचे पाहावयास मिळाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने गारवा निर्माण झाला.पोलादपूरमध्ये एक झाड कोसळल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अवकाळी पावसामुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, तर एकूणच वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. लग्नसराई जोरात सुरु असल्यामुळे अचानक झालेल्या या पावसामुळे सर्वांची चक्क त्रेधा उडाली होती. गावा-गावांतील लग्नसमारंभातील मंडप पावसाने काही ठिकाणी भिजून कोसळल्याने हळदी समारंभ कार्यक्र मात हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले. छोट्या व्यावसायिकांबरोबरच भातशेती व वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 01:05 IST