माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील दुर्गम भागावर २००३मध्ये इकोसेन्सेटिव्ह झोन लागू करण्यात आला आहे. याठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करताना सनियंत्रण समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. इथे चार दशकांपूर्वी झोपडपट्टी अस्तित्वात असून, नगरपालिकेच्या जागेवर बांधकामे करून नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून नगरपालिकेला वार्षिक करही भरला जातो. दिवसेंदिवस बांधकामे वाढत असल्याचे हरित लवादाच्या निदर्शनास येताच, एकूण ४२८ बांधकामे अनधिकृत ठरवून १५ मार्च २०१८ रोजी ती तोडण्याचे आदेश देण्यातआले.माथेरानचा विकास आराखडाही १९८७पासून शासनाने तयार केलेला नाही. नागरिकांनी गरजेनुसार बांधकामे केली असून, आता ती तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जेव्हा बांधकामे उभारली गेली त्या वेळी असलेल्या सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.एकीकडे शासन २०१५पर्यंतच्या बांधकामांस अभय देत असताना केवळ हे क्षेत्र इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे या ठिकाणी वेगळे नियम लावण्यात येत आहेत. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे.
माथेरानमधील बांधकामांवर हरित लवादाकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:22 AM