दासगांव : राज्यपालांच्या आदेशान्वये पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाडमधील पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या जवळपास २० लॅब शुक्रवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. मात्र चोरून ज्या लॅब सुरू ठेवण्यात येतील यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी महाड सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भास्कर जगताप यांनी ठाम भूमिका मांडली आहे. पॅथॉलॉजिस्टने दिलेल्या तपासणीच्या निकषावर रुग्णांचे पुढील उपचार होतात. या तपासणीकरिता तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट किंवा एमडी डॉक्टर असणे गरजेचे आहे. मात्र सर्वच ठिकाणी पॅथॉलॉजिस्टऐवजी टेक्निशियननेच लॅब सुरू केल्या होत्या. शासकीय नियम धाब्यावर बसवून रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा रुपये घेवून हे टेक्निशियन तपासण्या करत होते. यावर आरोग्य विभागाची यंत्रणा देखील डोळेझाक करत होती. खासगी हॉस्पिटल आणि या लॅबमध्ये संबंध असल्याने डॉक्टर याच लॅबमधून तपासण्या करून घेण्याचा आग्रह धरीत असत. शासनाने आता यावर निर्बंध घालून पॅथॉलॉजिस्टकडूनच तपासणी करण्याचे धोरण अवलंबले आहे. राज्यपालांनी त्या पद्धतीत वटहुकूम काढला असून पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅब बंद करण्याचे आदेश आता आरोग्य विभागाने दिले आहेत. महाड तालुक्यात जवळपास २० हून अधिक पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या टेक्निशियन चालवत असलेल्या लॅब आहेत. केवळ डॉ. एम. जी. पवार यांची एकमेव लॅब ही महाड तालुक्यात अधिकृत आहे. अन्य लॅब या इतर भागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सह्यांचा वापर करून तपासणी अहवाल देत असत. या बंदीच्या निर्णयामुळे महाड तालुक्यातील २० हून अधिक लॅबवर गंडा आला असून या सर्व लॅब शुक्रवारपासून बंद झाल्या आहेत. ज्या हॉस्पिटलअंतर्गत अशा प्रकारच्या महाडमध्ये लॅब सुरू ठेवल्या होत्या त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्यांच्या पाठबळावर या लॅब सुरू होत्या त्या अधिकाऱ्यांना देखील शासनाने जाब विचारणे गरजेचे आहे. (वार्ताहर)पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅबना या अगोदर वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. शासनाच्या या निर्णयानुसार बंद करण्यात आल्या नाही तर यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.- भास्कर जगताप, वैद्यकीय अधिकारी, महाडएकमेव अधिकृ त लॅबमहाड तालुक्यात जवळपास २० हून अधिक पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या टेक्निशियन चालवत असलेल्या लॅब आहेत. केवळ डॉ. एम. जी. पवार यांची एकमेव लॅब ही महाड तालुक्यात अधिकृत आहे अशी माहिती मिळाली.
महाडमधील २० लॅब बंद
By admin | Updated: May 28, 2016 02:38 IST